
दोहा, 02 जुलै (हिं.स.)। कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते माजेद अल-अन्सारी यांच्या माहितीनुसार, कतार आणि पाकिस्तान यांनी दोहा येथे अमेरिकन आणि इराणी प्रतिनिधींशी स्वतंत्र बैठका घेतल्या. या बैठकींमध्ये १४ सूत्रीय सामंजस्य करार (एमओयू) संदर्भातील मुद्द्यांवर सकारात्मक प्रगती झाल्याचे सांगण्यात आले.
माजेद अल-अन्सारी यांनी गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले की, ही चर्चा लेक ल्यूसर्न शिखर परिषदेत झालेल्या निष्कर्षांच्या आधारे पुढे नेण्यात आली. तसेच इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेनंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.इराणचे कायदेविषयक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे उपपरराष्ट्रमंत्री काझेम घरीबाबादी यांनी सांगितले की, “दोहा बैठकीत आम्ही लेबनॉनमधील वचनबद्धता पूर्ण करण्यात अमेरिकेच्या अपयशाचा मुद्दा उपस्थित केला.”ते पुढे म्हणाले की, कतारच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत ६ अब्ज अमेरिकन डॉलरच्या निधीतील काही रकमेच्या वापरासंदर्भातील मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच जाहीर करण्यात आलेल्या गरजांच्या आधारे आवश्यक वस्तूंची खरेदी करून त्या इराणच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याबाबतही सहमती झाली.
इराणी अधिकाऱ्यांनी दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेचे आयोजन ४ ते ९ जुलै या कालावधीत इराण आणि इराकमधील विविध ठिकाणी करण्याची योजना आखली आहे. उल्लेखनीय म्हणजे, २८ फेब्रुवारी रोजी इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या हवाई हल्ल्यात अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता.यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे अण्वस्त्र निर्मूलन सुरळीतपणे सुरू असल्याचा दावा केला होता. कतारमध्ये वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय चर्चेत इराण सहभागी नसतानाही, दोन्ही देशांतील राजनैतिक प्रक्रियेबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode