
रायगड, 02 जुलै (हिं.स.)। कर्जत–कल्याण राज्य महामार्गावरील माथेरान मिनी रेल्वे फाटक परिसरातील रस्ता मोठ्या खड्ड्यांनी व्यापला असून, वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
रेल्वे फाटकाजवळील रस्ता पावसामुळे पूर्णपणे उखडला असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने ये-जा करतात. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघाताचा धोका वाढला असून, विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा संबंधित विभागांकडे तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रेल्वे फाटक परिसराचे सिमेंट काँक्रीटीकरण अथवा कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. परिणामी वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघातांची शक्यता वाढली आहे. या मार्गावर वाहतूकही संथ गतीने सुरू असून, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात कायमस्वरूपी उपाययोजना करून या समस्येवर तोडगा काढण्याचीही मागणी करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)