नांदेड जि. मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी २३ जागांसाठी २५५ उमेदवारी अर्ज दाखल
नांदेड, 02 जुलै (हिं.स.)। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी बँकेच्या मुख्यालयात राजकीय नेत्यांची मोठी गर्दी उसळली. शेवटच्या दिवशी अक्षरशः उमेदवारी अर्जाचा पाऊस पडला असून, २३ जागांसाठी तब्बल २५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आह
नांदेड जि. मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी २३ जागांसाठी २५५ उमेदवारी अर्ज दाखल


नांदेड, 02 जुलै (हिं.स.)। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी बँकेच्या मुख्यालयात राजकीय नेत्यांची मोठी गर्दी उसळली. शेवटच्या दिवशी अक्षरशः उमेदवारी अर्जाचा पाऊस पडला असून, २३ जागांसाठी तब्बल २५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांनी बँकेच्या मुख्यालयात उपस्थित राहून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, माजी आमदार माधवराव जवळगावकर, माजी आमदार मोहन हंबर्डे, हणमंत पाटील बेटमोगरेकर, श्रीनिवास चव्हाण, लक्ष्मण ठक्करवाड, भगवानराव पा. आलेगावकर, गोविंदराव नागेलीकर, पूनम पवार, डॉ. मीनल पाटील खतगावकर, शिवराज पाटील होटाळकर, कैलास देशमुख गोरठेकर, संजय पाटील कहऱ्हाळे, सुनील धोंडगे, कृष्णा पा. आष्टीकर आदींसह अनेक उमेदवारांचा समावेश आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खासदार, आमदार आणि अन्य दिग्गज नेत्यांनी थेट मैदानात उडी घेतल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय पटावर आपापले घोडे पुढे दामटण्यासाठी सर्वच गटांनी हालचालींना वेग दिला आहे.

पॅनल आणि आघाडीबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसला, तरी लवकरच यासंदर्भात चर्चा होईल, अशी प्रतिक्रिया खासदार रविंद्र चव्हाण यांनी दिली.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १६ जुलैपर्यंत आहे. त्यामुळे त्यापूर्वीच विविध गटांच्या पॅनलची आणि संभाव्य आघाड्यांची समीकरणे स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अन्य प्रमुख नेत्यांमध्ये अखेर एकमत होणार की स्वतंत्र पॅनल उभे राहणार, याकडे आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande