देशभरात मान्सूनचा कहर; डोंगराळ राज्यांत जनजीवन विस्कळीत
नवी दिल्ली, 02 जुलै (हिं.स.) : जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाच ते सहा दिवसांच्या विलंबानंतर मान्सून दाखल झाल्यानंतर मुसळधार पावसाने डोंगराळ भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी, भूस्खलन आणि रस्ते बंद झाल्याने वा
जम्मू-काश्मीर ढगफुटीचे संग्रहित छायाचित्र


नवी दिल्ली, 02 जुलै (हिं.स.) : जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाच ते सहा दिवसांच्या विलंबानंतर मान्सून दाखल झाल्यानंतर मुसळधार पावसाने डोंगराळ भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी, भूस्खलन आणि रस्ते बंद झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

उत्तराखंडमध्ये केदारनाथ धामासाठीची हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, आसाममध्ये पुरामुळे सुमारे 47 हजार नागरिक प्रभावित झाले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मुंबईतही मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. दुसरीकडे, दिल्ली-एनसीआरसह पंजाब आणि हरियाणामध्ये झालेल्या पावसामुळे उकाडा आणि दमट हवामानापासून मोठा दिलासा मिळाला आहे.जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात 2 ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्याने जनजीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच, किश्तवाड येथे माचैल माता आणि मिंधल माता यात्राही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. श्रीमाता वैष्णोदेवी धामासाठीची हेलिकॉप्टर सेवाही प्रभावित झाली आहे.

हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीती आणि चंबा जिल्ह्यांमध्ये तीन ठिकाणी ढगफुटी झाली असून, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे शिमला, मनाली आणि धर्मशाला परिसरातील ५० हून अधिक रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.उत्तराखंडमध्ये देहरादून, बागेश्वर आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. केदारनाथ धामासाठीची हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली असून, देहरादूनच्या जॉलीग्रँट विमानतळावरून उड्डाण करणारी चार विमाने अन्य विमानतळांकडे वळविण्यात आली आहेत.उत्तर प्रदेशातील बलिया येथे वीज कोसळल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

आसामच्या 6 जिल्ह्यांमध्ये पुराचा मोठा फटका बसला असून, ४६ हजार ९३८ हून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. सुमारे ३,८०९ हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. धेमाजी, लखीमपूर, बिस्वनाथ, नलबारी, डिब्रूगड आणि चिरांग हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले असून, १० महसूल मंडळांतील २२१ गावे पुराच्या विळख्यात आहेत.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत सलग दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, पालघर जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कर्नाटकातील मंगळुरू येथे भूस्खलनामुळे एक घर मातीखाली दबले. या दुर्घटनेत एका महिलेसह तिच्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande