
रायगड, 02 जुलै (हिं.स.)। : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप लवकरच 'Username' हे नवे फीचर आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना मोबाईल क्रमांकाऐवजी Username च्या माध्यमातून इतरांशी संपर्क साधता येणार असल्याने देशातील दूरसंचार क्षेत्रात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, या फीचरमुळे मोबाईल क्रमांक सार्वजनिकपणे शेअर करण्याची गरज कमी होऊ शकते. त्यामुळे गोपनीयतेला अधिक संरक्षण मिळण्याची शक्यता असली, तरी दुसरीकडे दूरसंचार कंपन्यांसमोर काही नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात.
काहींचे मत आहे की, Wi-Fi चा वापर करूनच अनेक ग्राहक संवाद साधू लागल्यास नवीन सिम कार्ड घेणे किंवा वारंवार रिचार्ज करण्याची गरज काही प्रमाणात कमी होऊ शकते. याचा परिणाम VI, Airtel आणि Jio सारख्या दूरसंचार कंपन्यांच्या व्यवसायावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, Username आधारित संपर्क पद्धतीमुळे बनावट ओळख, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांसंदर्भातही काही सुरक्षा प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या फीचरची अंमलबजावणी करताना मजबूत ओळख पडताळणी आणि सुरक्षा उपायांची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मात्र, व्हॉट्सअॅपच्या या फीचरमुळे मोबाईल क्रमांकाची आवश्यकता पूर्णपणे संपणार असल्याचे कोणतेही अधिकृत संकेत अद्याप देण्यात आलेले नाहीत. सध्या व्हॉट्सअॅप खाते तयार करण्यासाठी आणि प्राथमिक पडताळणीसाठी मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. त्यामुळे Username फीचरचा प्रत्यक्ष परिणाम किती होईल, हे त्याच्या अधिकृत अंमलबजावणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)