
पुणे, 02 जुलै (हिं.स.)।
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत विक्रमी कामगिरी करत ५२६ कोटी १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. अवघ्या तीन महिन्यांत ही उच्चांकी वसुली झाल्याने महापालिकेच्या महसुलात मोठी भर पडली आहे. या यशाबद्दल महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व करदात्यांचे आभार मानले आहेत.
महापालिका हद्दीत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक आणि इतर अशा एकूण ७ लाख ४४ हजार ६३० मालमत्तांची नोंद आहे. त्यापैकी ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी पहिल्याच तिमाहीत मालमत्ता कर भरला असून, हे प्रमाण एकूण नोंदणीकृत मालमत्तांपैकी ५९.८४ टक्के इतके आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने करदात्यांनी महापालिकेने जाहीर केलेल्या विविध सवलतींचाही लाभ घेतला आहे.
कर भरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी कर संकलन विभागाने विविध जनजागृती उपक्रम राबविले. मालमत्ता करावरील सवलतींची माहिती नागरिकांपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचविण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, पहिल्याच तिमाहीत मोठ्या संख्येने नागरिकांनी कर भरण्यास प्राधान्य दिले.
यंदा कर भरणाऱ्या ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांपैकी तब्बल ३ लाख ४७ हजार ५६४ नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून कर भरून सवलतींचा लाभ घेतला. तसेच गतवर्षीप्रमाणे यंदाही महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळेही कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु