परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता
बीड, 02 जुलै (हिं.स.)। परळी वैद्यनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांच्या एकूण ६३ कामांना राज्य सरकारने अधिकृत प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, याबाबतचा शासन निर्णय न
परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता


बीड, 02 जुलै (हिं.स.)।

परळी वैद्यनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांच्या एकूण ६३ कामांना राज्य सरकारने अधिकृत प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला आहे. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी या विकासकामांच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. काही दिवसांपूर्वीच या ६३ कामांना सुधारित मान्यता देण्याबाबत शिखर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता आणि आता प्रत्यक्षात प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या कामांना गती मिळणार आहे. सुधारित आराखड्यास नव्याने प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार तसेच मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.

सध्या परळी वैद्यनाथ येथील मंदिर व परिसरात या विकास आराखड्यांतर्गत भव्य दर्शन मंडप, दगडी पायऱ्या, प्रवेशद्वारे त्याचबरोबर भव्य भक्तनिवास अशी अनेक महत्त्वाची कामे प्रगतीपथावर असून काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. या सुधारित आराखड्याच्या माध्यमातून भाविकांसाठी भक्त निवास, दर्शन मंडप, आधुनिक शौचालये, संपूर्ण परिसराचे विद्युतीकरण, सुसज्ज पादचारी मार्ग आणि भव्य पार्किंग व्यवस्था अशा विविध स्वरूपाची एकूण ६३ कामे पूर्ण केली जाणार आहेत. या निधीमुळे तीर्थक्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार असून भाविकांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande