
पुणे, 02 जुलै (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (दि. ३ जुलै) रोजी मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीस शहरातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री सचिवालयाकडून अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे.
बैठकीला महापौर रवि लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील सुरक्षित, शाश्वत आणि अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या खुल्या कालव्याद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने पाणीगळती, बाष्पीभवन, अतिक्रमणे, प्रदूषणाचा धोका आणि देखभालीतील अडचणी यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. बंदिस्त जलवाहिनी उभारल्यानंतर या समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्याबरोबरच पाण्याची बचत, जलवाहतुकीची कार्यक्षमता आणि शहराच्या दीर्घकालीन पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता अधिक बळकट होणार आहे.
या प्रकल्पाला गती मिळावी यासाठी महापौर रवि लांडगे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे. प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री स्तरावर चर्चेला यावेत, यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात आले होते.
याबाबत महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा विषय नसून पिंपरी-चिंचवडच्या लाखो नागरिकांच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याशी संबंधित महत्त्वाचा प्रकल्प आहे. शहराचा विकास आणि भावी पिढ्यांची पाणीसुरक्षा लक्षात घेता हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी एकत्रितपणे शासनासमोर शहराची भूमिका मांडणार असून, प्रकल्पाला तातडीने गती मिळावी, यासाठी एकमुखी प्रयत्न केले जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु