
लातूर, 02 जुलै (हिं.स.)लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत शिरूर अनंतपाळ पोलिसांनी मोठी कारवाई करत एर्टिगा कारसह ११ लाख ७८ हजार १०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शिरूर अनंतपाळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कर्नाटकातून अहमदपूरच्या दिशेने येणाऱ्या एमएच-२४ एएस-४६२८ क्रमांकाच्या सिल्व्हर रंगाच्या एर्टिगा कारवर सापळा रचण्यात आला.
२ जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तळेगाव (दे.) येथे पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने कार जागेवरच सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
जप्त मुद्देमाल
विमल पान मसाला – ₹२,८३,९२०
व्ही-१ गुटखा – ₹१,२१,६८०
यू.के. जाफरानी जर्दा – ₹२२,५००
एर्टिगा कार – ₹७,५०,०००
एकूण जप्त मुद्देमाल : ₹११,७८,१००
तपासादरम्यान वाहनाच्या कागदपत्रांच्या आधारे सय्यद मोजम आजम आणि इब्राहिम तांबोळी (दोघेही रा. अहमदपूर, जि. लातूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम ५९ अंतर्गत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायबोळे करीत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गौतम घाडगे, संदीप साठे आणि विकास लोखंडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis