कलावंत मानधन योजनेतील निवड यादी रखडल्याने संताप; जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
अमरावती, २ जुलै (हिं.स.) : राजर्षी शाहू महाराज कलावंत साहित्यिक मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांची निवड यादी अद्याप तयार न झाल्याने जिल्ह्यातील कलावंतांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या निषेधार्थ संतप्त कलावंतांनी जिल्हा परिषदेसमोर ढोल-ताश
ढोल, ताशे वाजवून प्रशासनाचा निषेध


अमरावती, २ जुलै (हिं.स.) : राजर्षी शाहू महाराज कलावंत साहित्यिक मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांची निवड यादी अद्याप तयार न झाल्याने जिल्ह्यातील कलावंतांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या निषेधार्थ संतप्त कलावंतांनी जिल्हा परिषदेसमोर ढोल-ताशे वाजवून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवला.

या योजनेत ज्येष्ठ कलावंत व साहित्यिकांना मानधन देण्यात येते. अर्ज सादर करून चार महिने उलटूनही प्रशासनाने निवड यादी जाहीर केलेली नाही. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांपासून ही निवड प्रक्रिया प्रलंबित असल्याचा आरोप कलावंतांकडून करण्यात येत आहे.

यापूर्वी अर्जदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असतानाही अंतिम निवड यादी जाहीर न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय, शासकीय मानधन निवड समितीतील अशासकीय सदस्यांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचा मुद्दाही आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आला.

ही ऑडिओ क्लिप तपासण्यासाठी पोलिस प्रशासनाला आदेश द्यावेत, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी सदस्याला समितीतून बरखास्त करावे, तसेच अशासकीय सदस्यांचे गुणांकन शून्य करावे, अशी मागणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कलावंत वारकरी सेवा विकास आणि सन्मान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कलावंतांनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर ढोल-ताशांच्या गजरात निषेध आंदोलन केले. त्यानंतर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनही करण्यात आले.

आंदोलनात संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्याम खंडारे, सिद्धार्थ भवरे, गंगाधर घोटेकर, राजेश मडावी, गणेश धर्माळे, रमेश वाघमारे, मुरलीधर धनरे, ज्ञानेश्वर महाराज रोकडे, वंदना कुटे आदी उपस्थित होते.

दरम्यान, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर संबंधित तालुक्यात कलावंतांचे फेर सादरीकरण करून गुणांकन नव्याने करावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande