
नाशिक, 02 जुलै (हिं.स.)।
: नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात सकाळी नाशिक येथील छावा क्रांतिवीर सेनेच्या संपर्क कार्यालय,मुंबई नाका येथून शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता होणार असून,या आंदोलनाला प्रसिद्धी देण्यासाठी नाशिकमधील सर्व पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावे,असे आवाहन छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व शेतकरी बांधवांनी केले आहे.
या आंदोलनाद्वारे रिंग रोड प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या अलाइनमेंटमधील त्रुटी दूर करून चुकीचे अलाइनमेंट रद्द करण्यात यावे,नव्याने सर्वेक्षण करून डीपी व आरपी रोडच्या नियोजनानुसार नवीन अलाइनमेंट निश्चित करण्यात यावी,अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.
तसेच,ज्या जमिनींची नोंद जिरायती म्हणून करण्यात आली आहे,त्यांची योग्य पडताळणी करून बागायती म्हणून नोंद करण्यात यावी. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातील बाधित शेतकऱ्यांनाही २ गुणांकाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात येणार आहे.
याशिवाय,भूसंपादन,पुनर्वसन व पुनर्स्थापना कायदा २०१३ अंतर्गत गावनिहाय मागील तीन वर्षांतील खरेदीखतांची तपासणी करून त्या आधारे उच्चतम बाजारभाव निश्चित करून योग्य मोबदला जाहीर करण्यात यावा, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांकडून मांडली जाणार आहे.
रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्याला बळ देण्यासाठी सर्व बाधित शेतकरी, नागरिक व सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV