पुरंदर विमानतळासाठी १,०१० हेक्टर जमीन ताब्यात; संमतीसाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ
पुणे, 02 जुलै (हिं.स.)। पुरंदर तालुक्यात प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार करारनाम्याद्वारे संमती देण्याची अंतिम मुदत ३० जूनवरून वाढवून १५ जुलै करण्यात आली आहे. जि
collector dudi


पुणे, 02 जुलै (हिं.स.)।

पुरंदर तालुक्यात प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार करारनाम्याद्वारे संमती देण्याची अंतिम मुदत ३० जूनवरून वाढवून १५ जुलै करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली.

विमानतळ प्रकल्पासाठी सात गावांतील एकूण १,२१६ हेक्टर जमिनीचे संपादन प्रस्तावित आहे. त्यापैकी आतापर्यंत १,०१० हेक्टर जमीन प्रशासनाच्या ताब्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांना सुमारे १,१५० कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आला आहे.

राज्य शासनाने या प्रकल्पासाठी प्रति एकर १ कोटी ६१ लाख रुपयांचा मोबदला निश्चित केला आहे. उर्वरित भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूदही करण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) आणखी १,००० कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून, उर्वरित शेतकऱ्यांना मोबदला वाटपाची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत असून, विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादनाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande