कर्नाटकात होणार संघाच्या प्रांत प्रचारकांची बैठक
आगामी 10 ते 12 जुलैदरम्यान बेळगावात होणार विचारमंथन नागपूर, 02 जुलै (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक यंदा 10, 11 आणि 12 जुलै रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या य
संघ स्वयंसेवकांचा संग्रहित फोटो


आगामी 10 ते 12 जुलैदरम्यान बेळगावात होणार विचारमंथन

नागपूर, 02 जुलै (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक यंदा 10, 11 आणि 12 जुलै रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत संघाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा, शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम तसेच आगामी कार्ययोजनेवर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती संघाच्या प्रचार विभागाने दिली आहे.

या बैठकीत संघाच्या 11 क्षेत्रांतील आणि 46 प्रांतांतील प्रांत प्रचारक, सहप्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक आणि सह क्षेत्र प्रचारक सहभागी होणार आहेत. तसेच संघ प्रेरित 32 विविध संस्थांचे अखिल भारतीय संघटनमंत्रीही या बैठकीत उपस्थित राहतील. मार्च 2026 मध्ये समालखा येथे झालेल्या प्रतिनिधी सभेनंतर एप्रिल, मे आणि जून महिन्यांत देशभरात आयोजित करण्यात आलेल्या संघाच्या विविध प्रशिक्षण वर्गांचा आढावा हा बैठकीचा प्रमुख विषय असेल. याशिवाय शाखा विस्तार, प्रशिक्षण वर्गांचे अनुभव, शताब्दी वर्षांतर्गत आयोजित कार्यक्रमांचे मूल्यमापन तसेच आगामी कार्यक्रमांची रूपरेषा यावरही सविस्तर विचारमंथन करण्यात येईल. बैठकीत वर्ष 2026-27 साठी पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या देशव्यापी प्रवास कार्यक्रमाबाबत, संघाच्या शताब्दी वर्ष (2025-26) अंतर्गत उर्वरित कार्यक्रमांबाबत तसेच आगामी विजयादशमी (20 ऑक्टोबर 2026) पर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या नियोजनावरही चर्चा होणार आहे.

याशिवाय प्रचारक सध्याच्या राष्ट्रीय परिस्थिती, जनगणनेसह विविध समकालीन विषयांवरील आपले अनुभव मांडतील आणि त्यावर परस्पर विचारविनिमय करतील. या बैठकीस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, माननीय सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, सी. आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त, आलोक कुमार आणि अतुल लिमये यांच्यासह अखिल भारतीय कार्यविभाग प्रमुख आणि कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे 6 जुलै रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे दाखल होणार आहेत.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande