
पुणे, 02 जुलै (हिं.स.)।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘संघ शिक्षा वर्गा’चा प्रकट समारोप शनिवारी (दि. ४ जुलै) सायंकाळी ६ वाजता शनिवार पेठेतील रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. या समारोप सोहळ्यात संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून, ‘एचईएमआरएल’चे समूह संचालक व शास्त्रज्ञ डॉ. हिमांशु शेखर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
कसबा भाग संघचालक प्रशांत यादव आणि वर्गाचे सर्वाधिकारी दत्तात्रय गर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या स्वयंसेवकांसाठी १५ दिवसांच्या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. समारोप कार्यक्रमात स्वयंसेवक विविध शारीरिक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करणार असून, प्रांतातील वरिष्ठ पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या प्रशिक्षण वर्गाची सुरुवात १९ जून रोजी प्रांत सहकार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते झाली होती. वर्गात एकूण ७५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान शारीरिक आणि बौद्धिक सत्रांसह सामाजिक बांधिलकी, देशभक्ती आणि समाजसेवेची भावना दृढ करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान, समारोप कार्यक्रमाच्या वेळी पावसाची शक्यता असल्यास हा सोहळा रमणबाग मैदानाऐवजी केसरीवाडा येथील लोकमान्य सभागृहात आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु