
लातूर, 02 जुलै (हिं.स.)।
: राज्यातील दारिद्र्यरेषेखालील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलातून कायमची दिलासा मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने 'स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार (स्मार्ट)' योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लातूर परिमंडळातील तब्बल ४ लाख ८६ हजार ४४७ ग्राहक पात्र ठरणार असून, केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानामुळे अत्यल्प खर्चात एक किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
महावितरणच्या लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी पात्र ग्राहकांनी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा तातडीने लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
लातूर परिमंडळातील लाखो ग्राहकांना लाभ
या योजनेत लातूर परिमंडळातील ४,८६,४४७ ग्राहक पात्र असून त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील १,९७,९२१, बीड जिल्ह्यातील १,४९,०८६ आणि धाराशिव जिल्ह्यातील १,३९,४४१ ग्राहकांचा समावेश आहे. याशिवाय दारिद्र्यरेषेखालील ३,०५१ ग्राहकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अत्यल्प खर्चात सोलर प्रकल्प
एक किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी साधारण ५० हजार रुपये खर्च येतो. केंद्र शासनाच्या 'प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना' अंतर्गत ३० हजार रुपयांचे अनुदान मिळते. याशिवाय राज्य शासनाने 'स्मार्ट' योजनेतून अतिरिक्त अनुदान जाहीर केले आहे.
दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना ३५ टक्के (₹१७,५००) अतिरिक्त अनुदान मिळणार असून त्यांना केवळ ₹२,५०० खर्च करावा लागणार आहे.
अनुसूचित जाती-जमातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना ३० टक्के अतिरिक्त अनुदान मिळणार आहे.
सर्वसाधारण आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील ग्राहकांना २० टक्के अतिरिक्त अनुदान मिळणार असून त्यांचा खर्च सुमारे ₹५ ते ₹१० हजारांपर्यंत मर्यादित राहणार आहे.
योजनेसाठी आवश्यक अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा घरगुती वीज ग्राहक असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे वैध वीज जोडणी असावी तसेच सौर पॅनेल बसविण्यासाठी घराच्या छतावर पुरेशी जागा असणे गरजेचे आहे. अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही सौर अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच मागील १२ महिन्यांतील सरासरी वीज वापर १०० युनिटपेक्षा कमी असावा.
पाच वर्षांची मोफत देखभाल
या योजनेअंतर्गत पूर्णपणे भारतीय बनावटीचे आणि आयईसी (IEC) प्रमाणित सोलर मॉड्यूल्स बसविण्यात येणार आहेत. यासोबतच पुरवठादाराकडून पाच वर्षांची मोफत देखभाल व दुरुस्तीची हमी दिली जाणार आहे.
वीज बिल शून्य, अतिरिक्त उत्पन्नाची संधी
रूफटॉप सोलर प्रणालीमुळे घरगुती वीज बिलात मोठी बचत होणार असून अनेक ग्राहकांचे वीज बिल शून्यावर येऊ शकते. याशिवाय आवश्यकतेपेक्षा अधिक तयार झालेली वीज महावितरणला विकून अतिरिक्त उत्पन्नही मिळविता येणार आहे. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढल्याने हरित विकासाला चालना मिळणार असून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीलाही हातभार लागणार आहे.
महावितरणने पात्र ग्राहकांनी राष्ट्रीय सौर पोर्टलवर तातडीने नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis