रशियाचा कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला; आठ जणांचा मृत्यू
मॉस्को , 02 जुलै (हिं.स.)।गेल्या चार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला रशिया-युक्रेन संघर्ष दिवसेंदिवस अधिकच भीषण होत चालला आहे. युक्रेनकडून झालेल्या तीव्र ड्रोन हल्ल्यांनंतर गुरुवारी पहाटे रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या
रशियाचा कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला; आठ जणांचा मृत्यू


मॉस्को , 02 जुलै (हिं.स.)।गेल्या चार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला रशिया-युक्रेन संघर्ष दिवसेंदिवस अधिकच भीषण होत चालला आहे. युक्रेनकडून झालेल्या तीव्र ड्रोन हल्ल्यांनंतर गुरुवारी पहाटे रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साहाय्याने मोठा हल्ला केला. या हल्ल्यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.या भीषण हल्ल्यानंतर संपूर्ण कीव्हमध्ये स्फोटांचे आवाज आणि आगीच्या ज्वाळांनी थरकाप उडाला. अनेक निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या असून त्यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, या हल्ल्याच्या काही तास आधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी गुप्तचर माहितीच्या आधारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. रशिया राजधानीवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे सांगत, हवाई हल्ल्याचा सायरन वाजताच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर बुधवारी उशिरा रात्री सायरन वाजताच नागरिकांनी आपले पाळीव प्राणी आणि आवश्यक सामान घेऊन मेट्रो स्थानके व बंकरमध्ये आश्रय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास कीव्हमध्ये सलग अनेक मोठे स्फोट झाले. कीव्हचे महापौर विताली क्लिट्स्को यांनी सांगितले की, या हल्ल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात भीषण आग लागली. एका नऊ मजली निवासी इमारतीचे पूर्णपणे नुकसान होऊन ती कोसळली असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. बचाव पथके युद्धपातळीवर मदत आणि शोधमोहीम राबवत आहेत.याशिवाय, एका हॉटेलच्या छताला तसेच अनेक घरांना आग लागली. या हल्ल्यात मृतांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी प्राथमिक माहितीनुसार पाच वैद्यकीय कर्मचारी जखमी झाले आहेत.

रशियाच्या या मोठ्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शेजारील पोलंडने आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेला पूर्ण सतर्कतेवर ठेवले होते. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्याचे लक्षात आल्यानंतर पोलंडने आपल्या लढाऊ विमानांची सुरक्षा गस्त थांबवली.पोलंडच्या सशस्त्र दलाने एक्स या समाजमाध्यमावर याबाबत अधिकृत माहिती दिली. या ताज्या हल्ल्यादरम्यान पोलंडच्या हवाई हद्दीचे कोणतेही उल्लंघन झाले नसून देशाच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा युक्रेनने रशियातील अंतर्गत भाग, मॉस्को आणि क्रिमिया येथे ड्रोन हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे.विशेषतः रशियाच्या इंधन साठवण केंद्रांना लक्ष्य केले जात आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आरोप केला की, व्लादिमिर पुतिन यांना युद्ध सुरूच ठेवायचे आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर अशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे की, त्यांना युद्ध पुढे सुरू ठेवणेच अशक्य होईल.

दरम्यान, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी अमेरिकेला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. अमेरिकेकडून युक्रेनला सातत्याने पुरवले जाणारे शस्त्रास्त्रांचे सहाय्य गंभीर परिणाम घडवू शकते आणि त्यामुळे जागतिक शांततेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. तसेच, रशियाने राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना ‘दहशतवादी विचारसरणीचा नेता’ असे संबोधत त्यांच्यावरही टीका केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande