सोलापूर मनपा परिवहन समिती सदस्यांची निवड पुन्हा पुढे ढकलली; महत्त्वाचे निर्णय प्रलंबित
सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या सदस्य निवडीची प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. समितीच्या स्थापनेबाबत अपेक्षा निर्माण झाल्या असतानाच निर्णय पुढे ढकलण्यात आल्याने इच्छुक नगरसेवकांसह राजकीय वर्तुळात विविध
सोलापूर मनपा परिवहन समिती सदस्यांची निवड पुन्हा पुढे ढकलली; महत्त्वाचे निर्णय प्रलंबित


सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)।

सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या सदस्य निवडीची प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. समितीच्या स्थापनेबाबत अपेक्षा निर्माण झाल्या असतानाच निर्णय पुढे ढकलण्यात आल्याने इच्छुक नगरसेवकांसह राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

परिवहन समितीच्या सदस्यांची निवड नेमकी कधी होणार, याबाबत महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विविध राजकीय पक्षांमधील अंतर्गत चर्चा, सदस्यांच्या नावांबाबतचे मतभेद आणि बदलती राजकीय समीकरणे यामुळे निवड प्रक्रियेला विलंब होत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, परिवहन विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रशासकीय आणि धोरणात्मक निर्णय प्रलंबित असल्याने समितीची लवकरात लवकर स्थापना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शहर बससेवा अधिक सक्षम करणे, परिवहन विभागाचे आर्थिक नियोजन, तसेच प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समितीची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

समितीची स्थापना झाल्यानंतर परिवहन विभागातील विविध प्रलंबित प्रस्ताव आणि विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, सदस्य निवडीबाबत अंतिम निर्णय कधी होणार, याकडे महापालिका वर्तुळासह इच्छुक नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande