अपघातमुक्त सोलापूरसाठी पोलिसांची मोहीम; आयआयटी मद्रासकडून प्रशिक्षण
सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)।शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अपघातप्रवण ठिकाणी वाहतूक अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली असून, वाहतूक पोलिसांना दररोज निश्चित ठिकाणी
Cp


सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)।शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अपघातप्रवण ठिकाणी वाहतूक अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली असून, वाहतूक पोलिसांना दररोज निश्चित ठिकाणी ड्युटीवर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त वृष्टी जैन यांनी दिली.

सोलापूर शहरात सर्वाधिक अपघात होणारी १८ ठिकाणे (ब्लॅकस्पॉट) ओळखण्यात आली आहेत. या ठिकाणी कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत आणि कोणत्या कारणांमुळे अपघात घडतात, याचा सखोल अभ्यास सुरू आहे. या अभ्यासाच्या आधारे प्रत्येक ठिकाणी आवश्यक त्या सुधारणा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कामासाठी आयआयटी मद्रासच्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले आहे. अपघातांचे वैज्ञानिक विश्लेषण करून प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर दिला जाणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी जून महिन्यात शहरात झालेल्या नऊ गंभीर अपघातांत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा मात्र जून महिन्यात गंभीर अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या संख्येत प्रत्येकी चारने घट झाली आहे. हा सकारात्मक बदल कायम ठेवण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

बेशिस्त आणि भरधाव वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पोलिस उपायुक्त वृष्टी जैन यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. पोलिस दलातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून, सर्व दुचाकीस्वारांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा. वाहतूक नियमांविषयी जनजागृती आणि प्रबोधन मोहिमाही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande