
कोल्हापूर, 02 जुलै, (हिं.स.)। ‘कुशल वीज कर्मचारी ही महावितरणची जमेची बाजू आहे. अशा कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यास महावितरणचे तसेच त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचे न भरून येणारे नुकसान होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अपघातशून्य कामकाज हा उद्देश समोर काम करून ठेवून वीज यंत्रणेवर काम करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले. महावितरणचा कोल्हापूर शहर विभाग व विद्युत निरीक्षक कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने गुरुवार (दि.01) विद्युत भवन, ताराबाई पार्क येथे विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रीय सुरक्षा परिषद व केंद्रीय विद्युत प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ जून ते २ जुलै २०२६ या कालावधीत देशभर राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. यावेळी उपस्थित तांत्रिक कर्मचाऱ्यांना वीज उपकरणांचा सुरक्षित वापर, विद्युत अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, पावसाळ्यातील विद्युत सुरक्षेचे नियम तसेच विद्युत अपघात झाल्यास तातडीने करावयाची कार्यवाही याबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कार्यकारी अभियंता म्हसु मिसाळ, अभिजीत सिकनीस, विद्युत निरीक्षक नितीन सुर्यवंशी, सहाय्यक विद्युत निरीक्षक बबन इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्युत सुरक्षा शपथ घेण्यात आली. सहाय्यक विद्युत निरीक्षक बबन इंगळे यांनी जनमित्रांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करताना आपण काम करताना वाहिनींची पुर्ण माहिती करून घेणे, स्मार्ट सुरक्षा साधनांचा वापर करून सुरक्षित काम करावे तसेच अनधिकृतपणे काम न करणे, सहकाऱ्यास कल्पना न देता काम करण्याचे टाळावे असे सांगितले. सागर शिर्के यांनी विद्युत नियम 2003 कायद्यानुसार विद्युत सुरक्षा नियम व अपघातानंतर करावयाची कार्यवाही याबाबत विस्तृत माहिती दिली. राजेश वायदंडे यांनी कशाप्रकारे अपघात होऊ शकतात व त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत जनमित्रांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्युत सुरक्षेसंदर्भातील माहितीपत्रकांचे अनावरण करण्यात आले. सदरील माहितीपत्रके ही विद्युत रोहित्र वितरण पेट्यां व फिडर पिलरवर लावून सुरक्षितेबाबत जनजागृती करण्याचे नियोजन असल्याचे कोल्हापूर शहराचे कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास विद्युत निरीक्षक कार्यालायचे सागर शिर्के, साहीर बागवान, स्मिता झिमरे, दुर्गेश सबनीस, प्रभाकर पतंगे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय तीरमारे, राजेश वायदंडे, नितीन धुमाळ, संदीप पाटील, भिकाजी भोळे, अमित पाटणकर, गणेश चांदणे, रत्नाकर मोहते, सर्व शाखा अभियंता, जनमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar