
रायगड, 02 जुलै (हिं.स.)। : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सात तालुक्यांतील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना आज (२ जुलै) सुटी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
सुटी लागू करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या सात तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अंगणवाड्या आज बंद राहणार आहेत.
हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिला असून अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. संभाव्य पूरस्थिती, दरडी कोसळण्याचा धोका आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, नदी-नाले, धबधबे आणि समुद्रकिनाऱ्यालगत जाणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित यंत्रणांशी तातडीने संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळाला असून, हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय वेळोवेळी जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)