
वर्धा, 02 जुलै (हिं.स.) । शहरालगतच्या पिपरीसह १४ गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक योजना गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. येळाकेळी परिसरात खोदकामादरम्यान मुख्य पाइपलाइन फुटल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशन अंतर्गत चालणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
या योजनेअंतर्गत पिपरी (मेघे), कारला, सावंगी (मेघे), सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी मेघे, साटोडा, आलोडी, दत्तपूर, वरुड, वायगाव निपाणी, नालवाडी, म्हसाळा आणि सालोड (हिरापूर) या गावांना पाणीपुरवठा होतो. मात्र गेल्या गुरुवारपासून नळांना पाणी न आल्याने ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना हातपंप, विहिरी तसेच दूरच्या भागांवर अवलंबून राहावे लागत असून घरगुती कामांसाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी ज्यांच्याकडे बोअरवेल किंवा खासगी विहिरी आहेत त्यांना तात्पुरता दिलासा मिळत आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाइपलाइनमध्ये वारंवार होणारे लिकेज, तात्पुरती दुरुस्ती आणि नियोजनाचा अभाव यामुळे समस्या कायम असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाणी बंद राहणार असल्याची पूर्वकल्पना न देणे आणि टँकरद्वारे पर्यायी व्यवस्था न करणे यावरही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मुख्य पाइपलाइनची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा अडचणी टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी