डॉ. शरद गोरे यांच्या साहित्यसेवेची जागतिक दखल; अमेरिकेच्या 'वर्ल्ड बुक'मध्ये विश्वविक्रमाची नोंद
सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)। माढा तालुक्यातील उपळाई (बुद्रूक) येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवी, लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या प्रदीर्घ साहित्यसेवेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. अमेरिकेत
sdfg


सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)।

माढा तालुक्यातील उपळाई (बुद्रूक) येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवी, लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या प्रदीर्घ साहित्यसेवेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. अमेरिकेतील 'वर्ल्ड बुक' या संस्थेने त्यांच्या साहित्यिक कार्याची जागतिक विक्रम (वर्ल्ड रेकॉर्ड) म्हणून नोंद केली आहे. गेली ३३ वर्षे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या डॉ. गोरे यांच्या या यशामुळे मराठी साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण आहे.

डॉ. गोरे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत तब्बल १९६ मराठी साहित्य संमेलने आयोजित करून एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, ही सर्व संमेलने कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय केवळ लोकवर्गणीतून यशस्वीपणे पार पडली आहेत. ग्रामीण, नवोदित, युवा, पर्यावरण, शिक्षक तसेच महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नारायण सुर्वे, जनकवी पी. सावळाराम आणि राजकुमार काळभोर यांच्या नावाने प्रबोधनपर साहित्य संमेलनांचे आयोजन करून त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाची परंपरा जोपासली आहे. तसेच मॉरिशसमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करून मराठीचा झेंडा सातासमुद्रापार नेला आहे.

डॉ. गोरे यांचे कार्य केवळ साहित्य संमेलनांपुरते मर्यादित नसून त्यांनी विविध विषयांवर दोन हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी दहा ग्रंथांचे लेखन केले असून, छत्रपती संभाजी महाराज लिखित 'बुधभूषण' या संस्कृत ग्रंथाचा त्यांनी केलेला मराठी काव्यानुवाद विशेष लोकप्रिय ठरला आहे.

त्यांच्या 'युगंधर प्रकाशन' संस्थेमार्फत आजवर १५५ दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले असून, अनेक नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. साहित्याबरोबरच चित्रपट क्षेत्रातही त्यांनी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि संगीतकार अशा विविध भूमिका निभावत पाच मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या 'एक प्रेरणादायी प्रवास – सूर्या' या चित्रपटाला कान्स आणि बर्लिनसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरव मिळाला आहे.

डॉ. शरद गोरे यांच्या या जागतिक सन्मानामुळे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठी साहित्यविश्वातून त्यांचे अभिनंदन होत असून, मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा हा मोठा गौरव मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande