शनिवारवाड्यातील बंद जलयंत्रणा होणार पूर्ववत; केंद्रीय पुरातत्त्व विभागाचा निर्णय
पुणे, 02 जुलै (हिं.स.)। पेशव्यांच्या काळातील अद्वितीय जलव्यवस्थापनाचा इतिहास पुन्हा उजेडात आणण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अडीचशे वर्षांपूर्वी शनिवारवाड्यात पाण्याचा पुरवठा कसा केला जात होता, हजारी कारंज्यात पा
grdf


पुणे, 02 जुलै (हिं.स.)।

पेशव्यांच्या काळातील अद्वितीय जलव्यवस्थापनाचा इतिहास पुन्हा उजेडात आणण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अडीचशे वर्षांपूर्वी शनिवारवाड्यात पाण्याचा पुरवठा कसा केला जात होता, हजारी कारंज्यात पाणी कोणत्या यंत्रणेद्वारे फिरवले जात होते आणि कात्रजवरून आणलेले पाणी वर्षभर शनिवारवाड्याला कसे पुरत होते, याचा सखोल अभ्यास करून बंद पडलेली जलव्यवस्था पूर्ववत करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.

या कामासाठी केंद्र शासनाकडून कार्यादेश प्राप्त झाला असून, पावसाचा अंदाज लक्षात घेऊन लवकरच शनिवारवाडा परिसरात उत्खनन करण्यात येणार आहे. उत्खननातून ऐतिहासिक जलवाहिन्या, पाण्याची साठवण आणि वितरण व्यवस्था याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

इतिहासानुसार, शनिवारवाडा उभारल्यानंतर सुरुवातीच्या काळात तेथे कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सुविधा नव्हती. त्यानंतर नानासाहेब पेशवे यांनी कात्रजजवळ दोन धरणे उभारून कृत्रिम तलाव तयार केले आणि त्या काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नळयोजना विकसित केली. या योजनेद्वारे कात्रजहून शनिवारवाड्यापर्यंत वर्षभर पाणीपुरवठा केला जात असे.

विशेष म्हणजे, हे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण वाड्यात फिरवले जात होते. याच जलव्यवस्थेवर आधारित प्रसिद्ध हजारी कारंज्याची उभारणी करण्यात आली होती. मात्र, कालांतराने ही यंत्रणा बंद पडली असून कारंजेही निष्क्रिय झाले आहे. आता उत्खनन आणि संशोधनाच्या माध्यमातून ही ऐतिहासिक जलव्यवस्था पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande