सोलापूर महापालिकेतील अभियंता चौकशीच्या फेऱ्यात; अतिरिक्त पैशांच्या मागणीची तक्रार
सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेत सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्याम कन्ना यांच्याविरोधात नोकरी सांभाळत खासगी बांधकामाची ठेकेदारी केल्याचा आणि अतिरिक्त पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महापालिका
smc


सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)।

सोलापूर महानगरपालिकेत सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्याम कन्ना यांच्याविरोधात नोकरी सांभाळत खासगी बांधकामाची ठेकेदारी केल्याचा आणि अतिरिक्त पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर प्राथमिक तपासात तक्रारीत तथ्य आढळल्याने चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, श्याम कन्ना यांनी कुमठा नाका परिसरातील मार्कंडेय नगर येथील नागनाथ कुंटोजी यांच्या बांधकामाचा सुमारे ६० लाख रुपयांचा खासगी ठेका स्वीकारला होता. मी महापालिकेचा अधिकारी असल्याने तुमच्या बांधकामाला कोणताही अडथळा येऊ देणार नाही, असे आश्वासन देऊन त्यांनी हा ठेका घेतल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, ठरलेली रक्कम टप्प्याटप्प्याने स्वीकारल्यानंतर श्याम कन्ना यांनी आणखी २१ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली. ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर बांधकामातील त्रुटी दाखवून महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत नोटीस पाठविण्याचा दबाव टाकत पुन्हा पैशांची मागणी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणासंदर्भात तक्रारदाराने आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे तसेच व्हॉट्सॲपवरील संभाषणाचे पुरावे महापालिका आयुक्तांकडे सादर केले आहेत. या पुराव्यांची दखल घेत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सखोल चौकशीसाठी त्रिस्तरीय समितीची नियुक्ती केली असून, समितीच्या अहवालानंतर पुढील प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित सहायक अभियंता यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. चौकशी पूर्ण होईपर्यंत आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande