सोलापूर - जि . परिषदेच्या ११ योजनांचा लाभ; महिलांना पिकोफॉल मशीन तर मुलींना सायकली
सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनांतर्गत महिलांना पिकोफ
ZP news solpaur


सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)।

सोलापूर जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनांतर्गत महिलांना पिकोफॉल मशीन, पिठाची गिरणी, तर इयत्ता सातवी ते बारावीतील विद्यार्थिनींना सायकली देण्यात येणार आहेत. या ११ योजनांसाठी महिला व बालकल्याण विभागाला ३ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पुढील आठवड्यापासून अर्ज मागविण्यात येणार आहेत.

योजनांमध्ये महिलांसाठी पिकोफॉल मशीन, पिठाची गिरणी, महिला व मुलींसाठी टॅली आणि संगणकाचे मोफत प्रशिक्षण, कराटे प्रशिक्षण, तसेच दहावी-बारावीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत यांचा समावेश आहे. अनुसूचित जातीतील महिलांसाठीही पिकोफॉल मशीन, पिठाची गिरणी, टॅली व एमएस-सीआयटी प्रशिक्षणाच्या स्वतंत्र योजना राबविण्यात येणार आहेत.

इयत्ता सातवी ते बारावीतील मुलींना सायकली मिळण्यासाठी ग्रामसभेचा ठराव, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, घरापासून शाळेपर्यंतच्या अंतराचा दाखला, आधार कार्ड, यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसल्याचा ग्रामसेवकाचा दाखला आणि तहसीलदारांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा (कमाल १ लाख २० हजार रुपये) दाखला सादर करावा लागणार आहे.

महिला स्वावलंबी व्हाव्यात आणि मुलींच्या शिक्षणात आर्थिक कारणांमुळे खंड पडू नये, हा या योजनांचा मुख्य उद्देश असल्याचे महिला व बालकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे. कराटे प्रशिक्षण वगळता इतर सर्व योजनांसाठी ग्रामसभेचा ठराव अनिवार्य असणार आहे. तसेच सर्व योजनांसाठी वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा १ लाख २० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

या योजनांच्या अंमलबजावणीबाबत गुरुवारी महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून, लाभार्थ्यांची अंतिम निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande