टीईटी, पदोन्नती व बीएलओ नियुक्तीच्या मुद्द्यावर ९ जुलैला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन
अमरावती, २ जुलै (हिं.स.) : शिक्षक अभियोग्यता परीक्षा (टीईटी) नियमांमुळे निर्माण झालेली सेवा अस्थिरता, पदोन्नती प्रक्रियेतील अडथळे, संचमान्यता धोरण आणि बीएलओ नियुक्तीच्या विरोधात राज्यातील प्रमुख शिक्षक संघटनांनी ९ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी शाळा बं
९ जुलैला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन; शिक्षक संघटनांचा इशारा


अमरावती, २ जुलै (हिं.स.) : शिक्षक अभियोग्यता परीक्षा (टीईटी) नियमांमुळे निर्माण झालेली सेवा अस्थिरता, पदोन्नती प्रक्रियेतील अडथळे, संचमान्यता धोरण आणि बीएलओ नियुक्तीच्या विरोधात राज्यातील प्रमुख शिक्षक संघटनांनी ९ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. या दिवशी शिक्षक सामूहिक रजेवर जात शाळा बंद ठेवणार असून मुंबई येथे धरणे आंदोलनही करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शिक्षक संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र TET/CTET उत्तीर्ण शिक्षक कृती समिती, महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षक संघटना, शैक्षणिक व्यासपीठ तसेच मुख्याध्यापक संघ आदी संघटनांनी संयुक्तपणे या आंदोलनाची हाक दिली असून याबाबत शासनाला पूर्वसूचना देण्यात आली आहे.

शिक्षक संघटनांनी शिक्षण संचालकांनी सुरू केलेली विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया तातडीने स्थगित करून संबंधित आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच २०१० पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना टीईटी नियमांमध्ये शिथिलता देऊन किमान ४० टक्के गुणांची अट लागू करावी किंवा स्वतंत्र समकक्ष पात्रता परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पात्र सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीची संधी द्यावी, १५ मार्च २०२४ चे संचमान्यता धोरण रद्द करावे आणि प्राथमिक शिक्षकांना बीएलओसह सर्व अशैक्षणिक कामांतून पूर्णपणे मुक्त करावे, अशीही संघटनांची मागणी आहे.

शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. ९ जुलैच्या आंदोलनामुळे राज्यातील शैक्षणिक कामकाज विस्कळीत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने दिला आहे.ही माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande