
- ऑनलाइन परीक्षा पद्धतीला दर्शवला तीव्र विरोध
अमरावती, 02 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला विरोध करत अमरावतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शासन आणि एमपीएससी आयोगाविरोधात घोषणाबाजी करत आपली मागणी जोरदारपणे मांडली.
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, एमपीएससी परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी. ऑफलाइन परीक्षा अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी समान संधी उपलब्ध करून देणारी असल्याचा दावा त्यांनी केला.
आंदोलक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षांमुळे तांत्रिक अडचणी, सर्व्हर समस्या आणि संभाव्य गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता बाधित होऊ शकते, असा त्यांचा आरोप आहे.मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासन आणि एमपीएससी आयोगाकडे पाठवले. आगामी परीक्षांसाठी ऑफलाइन पद्धतीच लागू करावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे.
मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस बंदोबस्तात हे आंदोलन शांततेत पार पडले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी