
रत्नागिरी, 2 जुलै, (हिं.स.) । राजापूर नगरपरिषदेमार्फत शहरातील सर्व नळसंयोजनांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, या सर्वेक्षणादरम्यान अवैध नळजोडणी किंवा जलवाहिनीवर अनधिकृतरीत्या पंप बसविल्याचे आढळून आल्यास संबंधित नळसंयोजनधारकांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधित नळसंयोजन कायमस्वरूपी बंद करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
पालिकेकडून शहरातील पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम, सुरळित आणि सर्व नागरिकांना समान व न्याय्य पद्धतीने मिळावा, या उद्देशाने हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. काही ठिकाणी अवैधरीत्या घेतलेल्या नळजोडण्या तसेच पाणीपुरवठा लाइनवर अनधिकृत पंप बसविल्यामुळे इतर नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
सर्वेक्षणादरम्यान नियमबाह्य नळजोडणी किंवा पाणीपुरवठा यंत्रणेत अनधिकृत हस्तक्षेप आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून, त्यांचे नळसंयोजन कायमस्वरूपी बंद करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी