
अमरावती, २ जुलै (हिं.स.) : जिल्ह्यातील कळंब आणि घाटंजी पंचायत समित्यांमध्ये प्रत्येकी दोन गटविकास अधिकाऱ्यांची, तर दारव्हा पंचायत समितीत सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अनेक पंचायत समित्यांमध्ये नियमित गटविकास अधिकारी नसल्याने आतापर्यंत कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर चालविला जात होता.
रिक्त पदांवर कायमस्वरूपी नियुक्त्या करण्याची मागणी सातत्याने होत असतानाही शासन आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत होता. दरम्यान, आता शासनस्तरावरून गटविकास अधिकारी तसेच सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
या बदल्यांनुसार कळंब पंचायत समितीत अजय चव्हाण, घाटंजी पंचायत समितीत सिकंदर इनामदार यांची गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दारव्हा पंचायत समितीत सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून अनिल जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, दारव्हा पंचायत समितीचा कारभार पुढे प्रभारी पद्धतीनेच चालणार की नव्या अधिकाऱ्याकडे पूर्ण जबाबदारी दिली जाणार, याबाबत साशंकता कायम आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्यांमध्ये प्रशासकीय रिक्तता अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी प्रभारी व्यवस्थेवरच कामकाज सुरू असल्याने विकासकामांच्या गतीवर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, उमरखेड आणि वणी येथे दोन ठिकाणी नियमित गटशिक्षणाधिकारी कार्यरत असले तरी उर्वरित १४ तालुक्यांचा कारभार अद्यापही प्रभारी अधिकाऱ्यांमार्फतच चालविला जात आहे.
याशिवाय, वर्धा येथील धर्मपाल कुमरे यांची यवतमाळ पंचायत समितीत, तर वणी येथील स्नेहदीप काटकर यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे. मात्र, एसआयआरसाठी (मतदार नोंदणी) मतदान नोंदणी व सहाय्यक नोंदणी अधिकाऱ्यांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने या अधिकाऱ्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे बदली आदेशानंतरही कार्यमुक्तीची प्रतीक्षा अधिकाऱ्यांना करावी लागत आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी