
अमरावती, 02 जुलै (हिं.स.)।
शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत द्वारका नगर परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या दोन सफाई कामगारांना काही नागरिकांनी मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त सफाई कामगारांनी तातडीने कामबंद आंदोलन पुकारत गाडगे नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनस्थळी महानगरपालिकेच्या घंटागाड्याही उभ्या करण्यात आल्या असून कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली.मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे. आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत कामावर परतणार नसल्याची आक्रमक भूमिका सफाई कामगारांनी घेतली आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने सफाई कामगार जमा झाले. पोलिसांकडून संबंधित घटनेची चौकशी सुरू असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींवर त्वरित कारवाई करून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून प्रशासन व पोलीस यांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी