
रत्नागिरी, 2 जुलै (हिं.स.) । गुहागर येथील बहुचर्चित गोल्डनमॅन तथा कासव संरक्षक विश्वास महादेव खरे यांच्या खून प्रकरणी १२ वर्षांनंतर चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी आरोपी अमोल चंद्रकांत गाढवे (रा. बोपखेल, पुणे) आणि किरण रामदास कुचेकर (रा. उत्तमनगर, पुणे) यांना खून व चोरीच्या गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.
विश्वास खरे यांचा १ ऑक्टोबर २०१४ रोजी गुहागर येथील त्यांच्या ‘खरे प्लेझर पॉइंट’ या होमस्टेमध्ये खून झाला होता. गळ्यातील सुमारे दहा तोळे सोन्याची साखळी लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन पर्यटकांनी विळा व सुर्याने वार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यानंतर तीन महिन्यांनी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गुहागर पोलिसांनी तपास करून अमोल गाढवे, किरण कुचेकर आणि विष्णू किसन तनपुरे (रा. दिघी, पुणे) यांना जानेवारी २०१५ मध्ये अटक केली होती.
सरकार पक्षातर्फे अॅड. प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी प्रभावी बाजू मांडली. या खटल्यात एकूण ५१ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. मयताचे नातेवाईक, प्रत्यक्षदर्शी, सोनार, डॉक्टर, तहसीलदार, हस्ताक्षर तज्ज्ञ तसेच मोबाइल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या साक्षी आणि मोबाइल टॉवर सीडीआरसह परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. काही साक्षीदार फितूर झाले असतानाही सरकारी पक्षाने प्रभावी उलटतपासाद्वारे आरोपींविरुद्धचे पुरावे सिद्ध केले.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन गुहागर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी केला होता. चिपळूण येथे रुजू झाल्यानंतर न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी सलग युक्तिवाद ऐकून अवघ्या १२ दिवसांत या बहुचर्चित खटल्याचा निकाल दिला.
या निर्णयानंतर विश्वास खरे यांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली असून गंभीर गुन्ह्यांमध्ये कायद्याचा धाक कायम राहील, अशी प्रतिक्रिया सरकारी पक्षाकडून व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी