
अमरावती, 02 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत स्थानिक विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍण्ड रिसर्च यांच्या ‘अर्बन’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला.
६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा, राज्य मराठी एकांकिका स्पर्धा तसेच २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील विजेत्या कलावंत, तंत्रज्ञ व संस्थांचा विभागीय पारितोषिक वितरण समारंभ नागपूरच्या वसंतराव नाईक स्मृती सभागृहात पार पडला. ‘अर्बन’ एकांकिकेच्या उत्कृष्ट सादरीकरणासोबतच तांत्रिक विभागांमध्येही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यामध्ये आकांक्षा धंदर यांना प्रथम दिग्दर्शन, रेवणनाथ पागरुत यांना प्रकाशयोजनेत प्रथम, प्रणव गुजर यांना नैपथ्यात प्रथम, कार्तिक उमाळे यांना वेशभूषामध्ये प्रथम, तर अभंग व्यवहारे यांना द्वितीय संगीत दिग्दर्शन पुरस्काराने गौरविण्यात आले.
‘अर्बन’ या एकांकिकेसाठी कार्यरत विद्यार्थी संघामध्ये आकांक्षा धंदर (विद्यार्थी दिग्दर्शक), वेदश्री मोरखडे, ऋतुजा पांडे, मृण्मयी पोतदार, श्रावणी गव्हाणकर, अभंग व्यवहारे, रेवणनाथ पागरुत, प्रणव गुजर, कार्तिक उमाळे आणि तुषार तरोणे यांचा समावेश होता. या संघाचे व्यवस्थापक म्हणून प्रा. अर्पित चौधरी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांघिक सादरीकरण करून स्पर्धेत अव्वल स्थान मिळविले. या यशामुळे आगामी राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही संघाकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य डॉ. जी. आर. बमनोटे तसेच विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्यासह उपाध्यक्ष अॅड. उदय देशमुख, डॉ. हेमंत देशमुख, युवराजसिंग चौधरी, नितीन हिवसे, डॉ. पूनम चौधरी, पंकज देशमुख, प्रा. विनय गोहाड व गजानन काळे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी