
लातूर, 02 जुलै (हिं.स.)। केंद्र शासनाच्या 'विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)' (व्हीबीजी-राम-जी) योजनेची राज्यात १ जुलै २०२६ पासून अंमलबजावणी सुरू झाली असून, लातूर जिल्ह्यातही या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी घरकुल व सिंचन विहीर या कामांचे ई-मस्टर काढून प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्रारंभ करण्यात आला.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, कृषी व पशुसंवर्धन सभापती कविता गोरे, महिला व बालकल्याण सभापती शिवकन्या गोडभरले, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, विभागीय वन अधिकारी अमितराज जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव तसेच गट विकास अधिकारी संतोष माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी 'विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)' या विषयावरील माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील यांनी सांगितले की, या योजनेमुळे ग्रामीण विकासाला नवी चालना मिळणार असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करून घरकुल, जलसंधारण, सिंचन आणि इतर विकासकामांना गती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी सांगितले की, ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर कमी करून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. अभियानांतर्गत जलसुरक्षा, जलसंधारण, ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविकेला चालना देणारी विकासकामे आणि आपत्ती प्रतिबंधक उपाययोजना यावर विशेष भर दिला जाणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत सुविधा निर्माण होऊन विकासाला नवी दिशा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे यांनी मनरेगा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या जलसंधारण, घरकुल आणि रस्त्यांच्या कामांचा उल्लेख करत, नव्या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ यांनीही मार्गदर्शन केले. आशिष पावले यांनी सादरीकरणाद्वारे योजनेची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले, तर आभार संतोष माने यांनी मानले.
नवीन अभियानामुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच घरकुल, सिंचन, जलसंधारण आणि मूलभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis