
नाशिक, 02 जुलै (हिं.स.)। सातपुर परीसरातीलल पपया नर्सरी परिसरात एका घराबाहेर ठेवलेल्या रिकाम्या पाण्याच्या मडक्यात बंदुकीसारखी वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गावठी कट्टा सापडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केल्यानंतर ती वस्तू खरा गावठी कट्टा नसून लाईटर असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पपया नर्सरीजवळ राहणारे रितेश काळे यांच्या घराबाहेर जुने व अडगळीतले साहित्य ठेवण्यात आले होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घराची साफसफाई करताना रितेश यांच्या आई रिकामे मडके हलवत होत्या. त्यावेळी मडक्याच्या आत बंदुकीसारखी दिसणारी वस्तू त्यांच्या नजरेस पडली. अनोळखी वस्तू पाहून त्या घाबरल्या आणि त्यांनी तातडीने ही बाब रितेश काळे यांच्या निदर्शनास आणून दिली.
रितेश यांनी कोणतीही जोखीम न पत्करता जागरूक नागरिकाची भूमिका बजावत सातपूर पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सागर गुंजाळ यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित वस्तू ताब्यात घेतली. प्राथमिक तपासात ती वस्तू गावठी कट्टा नसून सिगरेट पिण्यासाठी वापरले जाणारे लाईटर असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेमुळे काही काळ परिसरात निर्माण झालेली भीती दूर झाली असली, तरी संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनी स्वतः हाताळण्याऐवजी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी केले आहे. रितेश काळे यांनी दाखविलेल्या सतर्कतेचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV