रत्नागिरी : वायंगणी येथे लाखी बागेविषयी शेतकरी जनजागृती
रत्नागिरी, 2 जुलै (हिं.स.) । वायंगणी (ता. रत्नागिरी) येथे वृक्षसंवर्धन, सेंद्रिय शेती आणि लाखी बाग संकल्पनेविषयी शेतकरी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कृषी दिनानिमित्त वायंगणीच्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत दापोलीतील उद्यानविद्या मह
वायंगणीतील कृषी दिन


रत्नागिरी, 2 जुलै (हिं.स.) । वायंगणी (ता. रत्नागिरी) येथे वृक्षसंवर्धन, सेंद्रिय शेती आणि लाखी बाग संकल्पनेविषयी शेतकरी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कृषी दिनानिमित्त वायंगणीच्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत दापोलीतील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या रावेच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग जपूया, शेती समृद्ध करू या या संकल्पनेवर आधारित शेतकरी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला गोळप ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप तोडणकर, वायंगणीचे पोलिस पाटील नितीन खाडे, कृषी सहाय्यक सौ. दीपाली साळुंके, मुख्याध्यापक सौ. दीपिका माळी, सदस्य सौ. शेडगे आणि सौ. राडिये, शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य व रावेच्या विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीने झाली. यावेळी पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि शाश्वत शेतीविषयी घोषणा देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. श्री वायंगणेश्वर मंदिराच्या परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर, शेतकरी व ग्रामस्थांचे स्वागत करून कृषी दिनाचे महत्त्व, शेतकऱ्यांचे योगदान तसेच हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

गो-कृपा अमृतम् तयार करण्याची पद्धत, त्यातील घटक, त्याचे महत्त्व, वापर आणि पिकांवरील सकारात्मक परिणाम याविषयी माहिती देण्यात आली. तसेच बायफ संस्थेच्या कु. प्राजक्ता हटिटे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व व नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या लाखी बाग संकल्पनेची माहिती देत नारळ बागेत जायफळ, काळी मिरी व दालचिनी यांसारख्या मसालापिकांची आंतरपीक पद्धती समजावून सांगण्यात आली. जपानी शेतकरी मसानोबू फुकुओका यांनी विकसित केलेल्या बीजगोळा (सीड बॉल) संकल्पनेची माहिती देऊन वृक्षसंवर्धन, जंगलांचे पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षणामधील त्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमात शेतकऱ्यांना गो-कृपा अमृतम्चे कल्चर वितरित करण्यात आले. शेतकऱ्यांनी रावेच्या विद्यार्थ्यांशी विविध कृषी विषयांवर संवाद साधून शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमात साहिल भोसले, श्रीरंग भडेकर, योगेश गायकवाड, कौस्तुभ इंदप, अथर्व कांबळे, ओंकार हाके आणि प्रणय भटकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या उपयुक्त व लोकाभिमुख कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande