
मुंबई, 02 जुलै (हिं.स.)। भारतातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि स्पोर्ट्स सायन्सला चालना देण्यासाठी अॅक्सिस बँक आणि गोस्पोर्ट्स फाउंडेशन यांनी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या कराराअंतर्गत बेंगळुरू येथे 'अॅक्सिस बँक-गोस्पोर्ट्स द परफॉर्मन्स इन्स्टिट्यूट' (AGTPI) सुरू करण्यात येणार आहे. भारतातील स्पोर्ट्स सायन्सची क्षमता वाढवणे, संशोधनाला चालना देणे आणि क्रीडा क्षेत्राचा दीर्घकालीन विकास साधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ही संस्था बेंगळुरू येथील अत्याधुनिक सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्स (CSE) मध्ये कार्यरत असेल. खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा, प्रतिभावान खेळाडूंचा शोध, स्पोर्ट्स सायन्स आणि स्पोर्ट्स मेडिसिन क्षेत्रातील क्षमता वाढवणे, तसेच भारतीय खेळाडूंवर आधारित संशोधन आणि विश्लेषणाला प्रोत्साहन देणे यावर संस्थेचा भर असेल.
संस्थापक भागीदार म्हणून अॅक्सिस बँकेचा सीएसआर निधी या संस्थेच्या उभारणीसाठी वापरण्यात येणार असून, गोस्पोर्ट्स फाउंडेशन प्रशासन, उपक्रमांची अंमलबजावणी आणि धोरणात्मक भागीदारीची जबाबदारी सांभाळणार आहे.
तीन प्रमुख स्तंभांवर आधारित कार्य
पीपल (People):
प्रशिक्षण, फेलोशिप, मार्गदर्शन आणि व्यावसायिक विकासाच्या माध्यमातून भारतातील स्पोर्ट्स सायन्स आणि परफॉर्मन्स क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार केले जाईल.
अॅनालिटिक्स (Analytics):
खेळाडूंची परफॉर्मन्स टेस्टिंग, बायोमेकॅनिक्स विश्लेषण, रिकव्हरी मॉनिटरिंग, दुखापतीचा धोका ओळखणे आणि डेटा-आधारित परफॉर्मन्स प्लॅनिंगसाठी विशेष केंद्र उभारले जाईल. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा स्वतंत्र डेटाबेस तयार करण्याचाही उपक्रम हाती घेतला जाणार आहे.
रिसर्च (Research):
संशोधन, नवोपक्रम, उद्योग व विद्यापीठांशी भागीदारी आणि ज्ञानप्रसाराच्या माध्यमातून भारतीय क्रीडा विज्ञानासाठी स्वदेशी संशोधन विकसित करण्यात येणार आहे.
मान्यवरांची प्रतिक्रिया
अॅक्सिस बँकेचे होलसेल बँक कव्हरेज, कॉर्पोरेट सॅलरी, सस्टेनेबिलिटी आणि सीएसआर विभागाचे ग्रुप हेड विजय मुलबागल म्हणाले, भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावर सातत्याने यश मिळवून देण्यासाठी स्पोर्ट्स सायन्स आणि स्पोर्ट्स मेडिसिनची मजबूत पायाभरणी आवश्यक आहे. गोस्पोर्ट्स फाउंडेशनसोबतच्या या सहकार्यामुळे भारतात सक्षम स्पोर्ट्स सायन्स परिसंस्था उभारण्यास मदत होईल.
गोस्पोर्ट्स फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त नंदन कामथ म्हणाले, उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी मजबूत यंत्रणा आवश्यक असते. ही भागीदारी भारतातील क्रीडा क्षेत्र अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनवेल.
गोस्पोर्ट्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौगतो बॅनर्जी यांनी सांगितले की, द परफॉर्मन्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून भारतातील क्रीडा क्षेत्राला जागतिक दर्जाचे पाठबळ मिळेल आणि खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी नवे मार्ग खुले होतील.
सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्सचे संस्थापक विवेक कुमार म्हणाले, प्रत्येक खेळाडूला सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सीएसईची स्थापना करण्यात आली आहे. एजीटीपीआयमुळे स्पोर्ट्स सायन्स, टेस्टिंग आणि संशोधन क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील.
दीर्घकालीन संस्थात्मक पाठबळ, संशोधन, कौशल्य विकास आणि स्पोर्ट्स सायन्स परिसंस्था मजबूत करण्याच्या उद्देशाने अॅक्सिस बँक आणि गोस्पोर्ट्स फाउंडेशनचा हा संयुक्त उपक्रम भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर