
मुंबई, 02 जुलै (हिं.स.)। अपहरण, खून, संशय आणि एकामागून एक उलगडत जाणारी रहस्ये…प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करणारा आगामी मराठी चित्रपट ‘बोल बोल राणी’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये वाढणारा थरार, वेगवान घडामोडी आणि प्रत्येक क्षणात अधिक गडद होत जाणारं रहस्य यामुळे हा ट्रेलर प्रेक्षकांना विचार करायलाही भाग पाडतो.
ट्रेलरमध्ये दिसते की या चित्रपटात सई ताम्हणकर एका वेगळ्या व रहस्यमय भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाची कथा तिच्या पात्राभोवती फिरत असल्याची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागचं सत्य नेमकं काय आहे? ती या रहस्याची बळी आहे की सूत्रधार? तिच्या प्रत्येक भावामागे आणि प्रत्येक संवादामागे अनेक प्रश्न दडलेले असल्याने तिचं पात्र चित्रपटातील सर्वात मोठं कोडं ठरणार असल्याची उत्सुकता ट्रेलर निर्माण करतो. मात्र केवळ तिचीच नव्हे, तर सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या व्यक्तिरेखाही तितक्याच गूढ आणि संशयास्पद वाटतात. प्रत्येक जण काहीतरी लपवत असल्याची भावना ट्रेलरमधून सतत जाणवते. ते या रहस्याचा उलगडा करणारे आहेत, की स्वतःच या गूढ घटनांमध्ये अडकलेले आहेत? ते सईच्या आयुष्यातील घटनांचे साक्षीदार आहेत, सूत्रधार आहेत की, या सगळ्याचे बळी ठरणार आहेत? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटातच मिळणार असल्याची उत्सुकता ट्रेलर निर्माण करतो. प्रत्येक पात्रावर संशय येतो, प्रत्येक प्रसंग नवा धक्का देतो आणि प्रत्येक ट्विस्टसोबत प्रेक्षकांचा अंदाज चुकीचा ठरतो. त्यामुळे ‘बोल बोल राणी’ हा प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा एक चित्रपट ठरणार आहे.
दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणाले, ”‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरमधून आम्ही रहस्याची एक छोटीशी झलक दाखवली आहे. या चित्रपटात प्रत्येक पात्राचं एक गुपित आहे आणि प्रत्येक ट्विस्ट प्रेक्षकांच्या अपेक्षांपेक्षा वेगळा आहे. विशेषतः सई ताम्हणकरने साकारलेली व्यक्तिरेखा तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तिच्या पात्राभोवती उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना प्रत्येक क्षणी नवा धक्का देईल.”
‘न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड’ निर्मित या चित्रपटाचे निर्माते अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली आहेत. यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी हे सहनिर्माते आहेत. सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बोल बोल राणी’ हा रहस्य, थरार आणि सस्पेन्सने भरलेला चित्रपट १७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
LINK : https://youtu.be/xEdb7D9ohXw?si=qpwfFUI7bG02WmZT
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर