सोलापूर - ‘स्टॉप डायरिया’ अभियानाला सुरुवात; ग्रामपंचायतींना स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना
सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)। पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसारजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा परिषदेने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमित स्
सोलापूर - ‘स्टॉप डायरिया’ अभियानाला सुरुवात; ग्रामपंचायतींना स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना


सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)।

पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसारजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा परिषदेने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमार्फत ‘स्टॉप डायरिया’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून अतिसारजन्य आजारांबाबत जनजागृती करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले की, अतिसार हा विशेषतः पाच वर्षांखालील बालकांसाठी जीवघेणा ठरू शकणारा आजार आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छतेचे नियम आणि वैयक्तिक स्वच्छतेचे पालन केल्यास या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळविता येऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करावी.

या अभियानात आरोग्य विभाग, ग्रामपंचायती, स्वच्छ भारत मिशन कक्ष, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच विविध सामाजिक संस्थांचा समन्वय राहणार आहे.

अभियानांतर्गत तालुका आणि ग्रामस्तरावर बैठका आयोजित करण्यात येणार असून, ग्रामपंचायती, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी आणि अतिसार प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande