
बीड, 21 जुलै, (हिं.स.)। परळी शहरातील गणेश पार रोडवरील बाबा रामदेव मंदिरासमोरील परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सेवानिवृत्त शिक्षक दिलीप कुलकर्णी यांच्या राहत्या घरात ही चोरी झाली. कुलकर्णी कुटुंबीय काही कामानिमित्त पुणे येथे गेले असल्याने घराला कुलूप होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटांची उचकापाचक करत सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. परळी शहरात अलीकडील काळात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis