
अमरावती, 21 जुलै (हिं.स.)। चांदूर रेल्वे येथील आनंद मठातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तगिरी गुरु जयरामजी महाराज हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक नियुक्त केले आहे. चांदूर रेल्वे पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
या प्रकरणात फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीतील आरोपांनुसार, आरोपीने दीर्घकाळ लैंगिक, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा दावा करण्यात आला आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. पीएसआय नंदलाल लिगोट यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजीव हाके पुढील तपास करीत आहेत.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, 2014 मध्ये धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तिची आरोपी महाराजांशी ओळख झाली. त्यानंतर विश्वास संपादन करून ऑगस्ट 2016 मध्ये तिला आनंद मठात बोलावण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच 2016 ते 30 मे 2026 या कालावधीत विविध आमिषे दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवणे, मानसिक व आर्थिक शोषण करणे असे आरोप तक्रारीत नमूद आहेत.
पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी तपास पथक कार्यरत केले असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणेदार सुरेश मस्के यांनी दिली
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी