
रायगड, 27 जुलै (हिं.स.) : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून विवाहितेला जातीवाचक शिवीगाळ, अपमान आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तळा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास बार्पे (ता. तळा) येथील वडिलोपार्जित जमिनीवरील देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला. फिर्यादी महिला या आरोपीच्या सुना असून त्या पतीसमवेत टिटवाळा (जि. ठाणे) येथे वास्तव्यास आहेत. त्या मूळ गावी आल्यानंतर देवदर्शनासाठी गेल्या असता आरोपीने त्यांचा आंतरजातीय विवाह मान्य नसल्याच्या कारणावरून वाद घालत जातीवाचक शब्दांचा वापर करून अपमान केल्याचा आरोप आहे.
तसेच फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करून गावात राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या पतीला धक्काबुक्की करण्यात आली असून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी तळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६५/२०२६ दाखल करण्यात आला असून अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ मधील कलम ३(१)(र), ३(१)(स) तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १२६(२), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ७५(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माणगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकांत पवार करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)