
रायगड, 27 जुलै (हिं.स.)। : खोपोली शहरातील भानवज परिसरातील वर्धमान विहार इमारतीतील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ₹१ लाख ८२ हजार ३३१ किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजल्यापासून २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत घराबाहेर होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने बंद घराच्या लोखंडी सुरक्षा दरवाज्याचा लॉक आणि कोयंडा धारदार हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून त्यामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ₹१,८२,३३१ किमतीचा ऐवज चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६२/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घरफोडीचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच संशयितांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)