
तेहरान, 03 जुलै (हिं.स.)।इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्या अनेक दिवस चालणाऱ्या अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यान, इराणच्या अर्धसैनिक दल इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) चे प्रभावशाली कमांडर जनरल अहमद वाहिदी दीर्घ काळानंतर प्रथमच सार्वजनिकरीत्या दिसले आहेत.
इराणी सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये जनरल वाहिदी हे खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसंदर्भातील एका बैठकीत सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर गुरुवारी रात्री तेहरानच्या मध्यवर्ती भागातील खामेनेई यांच्या जुन्या निवासस्थानाजवळ आयोजित करण्यात आलेल्या एका छोट्या शोकसभेतही ते त्यांच्या पार्थिवाजवळ बसलेले दिसले.
वृत्तानुसार, जनरल अहमद वाहिदी हे सध्या इराणच्या त्या धोरणात्मक पथकातील प्रमुख सदस्यांपैकी एक आहेत, जे अमेरिकेसोबतचे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी होणाऱ्या संभाव्य चर्चेत इराणची भूमिका निश्चित करत आहे. तज्ज्ञांच्या मते, इराणचे नवे सर्वोच्च नेते आयतुल्ला मोजतबा खामेनेई यांच्याशी थेट संपर्क असलेल्या मोजक्या व्यक्तींमध्ये वाहिदी यांचा समावेश आहे.
वृत्तात असेही म्हटले आहे की, वडील अली खामेनेई यांच्या निधनानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मोजतबा खामेनेई अद्याप सार्वजनिकरीत्या समोर आलेले नाहीत. दावा करण्यात आला आहे की, २८ फेब्रुवारी रोजी इस्रायलच्या हल्ल्यात अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता आणि त्याच हल्ल्यात मोजतबा खामेनेई हेही जखमी झाले होते.
अहवालानुसार, युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला होता. तसेच, जनरल अहमद वाहिदी हे ८ फेब्रुवारीनंतर प्रथमच सार्वजनिकरीत्या दिसल्याचेही सांगण्यात आले आहे. युद्ध सुरू होण्याच्या काही आठवडे आधीपासून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते.
इराणी सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये तेहरानमधील खामेनेई संकुलातील हुसेनियाजवळ आयोजित करण्यात आलेली शोकसभा दाखवण्यात आली आहे. या शोकसभेत अली खामेनेई यांचे पार्थिव मंचावर ठेवलेल्या ताबूतात ठेवण्यात आले होते. ताबूतासमोर लाल रंगाच्या ट्युलिप फुलांची सजावट करण्यात आली होती, तर छतावर कागदी फुलपाखरे लटकवण्यात आली होती.
सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, काळ्या रंगाचे कपडे परिधान करून शोक व्यक्त करणाऱ्यांमध्ये २०२५ मधील १२ दिवस चाललेल्या युद्धात तसेच अलीकडील इराण युद्धात आपल्या नातेवाईकांना गमावलेल्या कुटुंबीयांचाही समावेश होता. श्रद्धांजली अर्पण करताना अनेकांनी आपले स्कार्फ आणि इतर वस्तू ताबूताच्या दिशेने फेकल्या. तेथील स्वयंसेवकांनी त्या वस्तूंना ताबूताचा स्पर्श करून पुन्हा संबंधितांना परत दिले. इराणमध्ये ही श्रद्धा व्यक्त करण्याची पारंपरिक धार्मिक प्रथा मानली जाते.
नंतर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये अली खामेनेई यांच्या ताबूतावर लाल रंगाचा ध्वज पांघरलेला दिसला. त्यावर पांढऱ्या अक्षरांत ‘या हुसेन’ असे लिहिले होते. शिया समुदायात हा शब्दप्रयोग पैगंबर मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ वापरला जातो. हा ध्वज यापूर्वी इराकमधील करबला येथे असलेल्या इमाम हुसेन यांच्या सुवर्ण घुमट असलेल्या दर्ग्यावर फडकत होता.
अहवालानुसार, शनिवारपासून अली खामेनेई यांच्या अनेक दिवस चालणाऱ्या अंत्यसंस्काराला सुरुवात होणार आहे. या काळात त्यांचे पार्थिव इराणमधील विविध शहरांमध्ये तसेच शेजारील इराकमध्येही नेले जाणार आहे. अंत्यसंस्काराची सुरुवात तेहरानमधील ग्रँड मोसल्ला येथून होणार असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्याची आणि दैनंदिन वाहतुकीवर तसेच सामान्य जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. श्रद्धांजली कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode