
वॉशिंग्टन, 03 जुलै (हिं.स.)।अमेरिकेने मध्यपूर्वेतील आपल्या सहयोगी देशांच्या माध्यमातून इराणला इस्रायलच्या कथित हत्येच्या कटाबाबत आगाऊ इशारा दिला होता.
अमेरिकेतील वृत्तानुसार, अमेरिकेने गुप्तपणे इराणला इशारा दिला होता की, इस्रायल इराणच्या दोन प्रमुख वाटाघाटी प्रतिनिधींची हत्या करण्याचा प्रयत्न करू शकतो. या इशाऱ्यामागे अमेरिकेची मोठी चिंता होती. इस्रायलने या नेत्यांना लक्ष्य केले, तर युद्ध थांबवण्यासाठी आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी सुरू असलेली शांतता प्रक्रिया पूर्णपणे कोलमडेल आणि संपूर्ण प्रदेश पुन्हा एकदा भीषण युद्धाच्या खाईत लोटला जाईल, अशी भीती अमेरिकेला होती.
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इस्रायलच्या निशाण्यावर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ हे दोन वरिष्ठ नेते होते. एका अज्ञात अमेरिकन अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितले की, “जर इस्रायलने या नेत्यांची हत्या केली, तर शांततापूर्ण चर्चेची सर्व आशाच संपुष्टात येईल.”
अहवालानुसार, ही चिंता इतकी गंभीर होती की, यावर्षीच्या सुरुवातीला अमेरिकेने काही मित्रदेशांच्या माध्यमातून तेहरानला संदेश पाठवून इस्रायलकडून त्यांच्या वरिष्ठ नेत्यांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला होता. एवढेच नव्हे, तर मार्च महिन्यात अमेरिकन अधिकाऱ्यांनी थेट इस्रायललाही सांगितले होते की, जोपर्यंत राजनैतिक वाटाघाटी सुरू आहेत, तोपर्यंत इराणच्या राजकीय नेतृत्वाला लक्ष्य करू नये.या प्रकरणावर व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा कोणत्याही परिस्थितीत शांतता प्रक्रिया यशस्वी व्हावी, अशी आहे. मात्र, वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासाने या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
अहवालानुसार, मार्च महिन्यात इस्रायलने इराणचे वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांची कथित हत्या केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला. एका पाश्चिमात्य अधिकाऱ्याने या घटनेला ‘टर्निंग पॉइंट’ असे संबोधले आहे. अमेरिकेला इराणकडून चर्चेसाठी एखादा वरिष्ठ प्रतिनिधी हवा होता, पण त्याचवेळी लारीजानी यांची हत्या झाल्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली.
त्यानंतर एप्रिलमध्ये प्रारंभिक युद्धविराम घडवून आणण्यासाठी आणि जूनमध्ये व्यापक कराराचा आराखडा तयार करण्यासाठी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसद अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ हेच अमेरिकेचे प्रमुख संपर्क अधिकारी बनले.अहवालात आणखी एका धक्कादायक घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, एप्रिलमध्ये युद्धविरामानंतरही इस्रायल या दोन्ही नेत्यांना लक्ष्य करण्याच्या तयारीत होता.
१२ एप्रिल रोजी इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ हे इस्लामाबादमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्याशी चर्चा करून परतत असताना, त्यांच्यावर इस्रायलकडून हल्ला होऊ शकतो, अशी गुप्तचर माहिती मिळाली. या इशाऱ्यानंतर त्यांच्या विमानाचे इराणमधील मशहद येथे तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रस्तेमार्गे सुरक्षितपणे तेहरान गाठले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode