
तेहरान, 03 जुलै (हिं.स.)।इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे. दरम्यान, एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. वृत्तानुसार, सध्याचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई हे आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला सार्वजनिकरीत्या उपस्थित राहणार नाहीत. यामागे गंभीर सुरक्षा चिंता असल्याचे सांगितले जात आहे.
भारतातील इराणचे प्रतिनिधी आयातुल्ला हाकिम इलाही यांनी सांगितले की, इस्रायलकडून संभाव्य धोका आणि देखरेखीच्या (निगराणीच्या) जोखमीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमात मोजतबा खामेनेई यांची उपस्थिती सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. इस्रायलकडून संभाव्य हल्ला किंवा निगराणीची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या उपस्थितीला टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वृत्तानुसार, अली खामेनेई यांचे अंत्यसंस्कार ४ जुलै ते ९ जुलै या कालावधीत इराण आणि इराकमधील विविध ठिकाणी पार पडणार आहेत. या काळात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा देत इस्रायलवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, इराणच्या नेतृत्वाला किंवा जनतेला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास त्याला तात्काळ आणि कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.अराघची यांचे हे वक्तव्य अशा वृत्तानंतर आले आहे, ज्यामध्ये इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी कथितरित्या मोजतबा खामेनेई यांना लक्ष्य करण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचा दावा करण्यात आला होता. इराणने या प्रकरणाला गंभीर सुरक्षा आव्हान म्हणून पाहिले आहे.
तणावपूर्ण वातावरण असतानाही कूटनीतिक प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच कतार आणि पाकिस्तान यांनी दोहा येथे अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींशी स्वतंत्र बैठका घेतल्या. या बैठकींमध्ये १४ कलमी सामंजस्य कराराशी (एमओयू) संबंधित मुद्द्यांवर सकारात्मक प्रगती झाल्याचे सांगण्यात आले.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवली असून अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही संवादाचे दार खुले असल्याचे संकेत मिळत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode