भारत-पाक युद्ध टॅरिफच्या धमकीने थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा
वॉशिंग्टन , 03 जुलै (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य युद्ध त्यांनी शुल्कवाढीच्या (टॅरिफ) धमकीमुळे थांबवले होते. ट्रम्प म्हणाले की, जर दोन्ही देशांनी संघर्ष सु
भारत-पाक युद्ध टॅरिफच्या धमकीने थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा


वॉशिंग्टन , 03 जुलै (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य युद्ध त्यांनी शुल्कवाढीच्या (टॅरिफ) धमकीमुळे थांबवले होते. ट्रम्प म्हणाले की, जर दोन्ही देशांनी संघर्ष सुरूच ठेवला असता, तर त्यांनी त्यांच्यावर २०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादले असते. मात्र, भारताने यापूर्वीच हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावत सांगितले आहे की, दोन्ही देशांतील संघर्षविराम कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीमुळे नव्हे, तर भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील थेट चर्चेनंतर झाला होता.

अमेरिकेतील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की, आपल्या कार्यकाळात त्यांनी एकूण आठ युद्धे रोखली असून त्यापैकी पाच युद्धे केवळ शुल्कवाढीच्या इशाऱ्यामुळे थांबली. भारत आणि पाकिस्तानचे उदाहरण देत त्यांनी दावा केला की, दोन्ही अण्वस्त्रसज्ज देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. मात्र, आर्थिक दबावाच्या इशाऱ्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी झाला. मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “मी आठ युद्धे थांबवली. त्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. जर तुम्ही युद्ध सुरूच ठेवले, तर मी तुमच्या देशावर २०० टक्के टॅरिफ लावेन. मी भारतालाही हेच सांगितले आणि पाकिस्तानलाही.”ट्रम्प यांनी पुढे दावा केला की, त्या काळात दोन्ही देशांतील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती आणि कोणत्याही क्षणी युद्ध भडकू शकले असते. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अण्वस्त्रसज्ज देश असल्याने त्यांच्यातील संघर्ष अत्यंत धोकादायक ठरला असता, असेही त्यांनी म्हटले.

ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा ते सातत्याने आपल्या व्यापार धोरणाला आणि शुल्कवाढीला (टॅरिफ) प्रभावी राजनैतिक शस्त्र असल्याचे सांगत आहेत. ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यात आणखी एक दावा करत सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, शहबाज शरीफ यांनी त्यांना सांगितले की, हे युद्ध रोखून त्यांनी किमान तीन कोटी लोकांचे प्राण वाचवले.याशिवाय, भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान ११ लढाऊ विमाने पाडण्यात आली होती आणि दोन्ही देश व्यापक युद्धाच्या दिशेने वाटचाल करत होते, असाही दावा ट्रम्प यांनी केला. मात्र, या दाव्यांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतेही अधिकृत पुरावे सादर केले नाहीत.

दरम्यान, भारत सरकारने ट्रम्प यांचे असे दावे यापूर्वीही स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. भारताची भूमिका स्पष्ट आहे की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान निर्माण झालेल्या लष्करी तणावानंतर झालेला संघर्षविराम हा भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संचालन महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) झालेल्या थेट संवादातून झाला होता. भारत सातत्याने हेही सांगत आला आहे की, पाकिस्तानशी संबंधित सर्व प्रश्न हे द्विपक्षीय आहेत आणि कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी वारंवार केलेल्या या दाव्यांना भारताने अधिकृत मान्यता दिलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande