
इस्लामाबाद , 03 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तूनख्वा प्रांतात शुक्रवारी प्रवाशांनी भरलेली एक बस खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत महिला आणि लहान मुलांसह किमान ४० जणांचा मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस पेशावरकडे जात होती. बलुचिस्तानमधील शेरानी जिल्हा पार केल्यानंतर बस खैबर पख्तूनख्वामधील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात प्रवेश करत असताना हा अपघात झाला.या दुर्घटनेत आठ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, बसचे ब्रेक निकामी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डोंगराळ भागातील एका तीव्र वळणावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळली. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डोंगराळ भागात अशा प्रकारचे रस्ते अपघात वारंवार घडत असून ते अनेकदा जीवघेणे ठरतात. दुर्गम भौगोलिक परिस्थिती, प्रतिकूल हवामान आणि वाहतूक नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन ही अशा अपघातांची प्रमुख कारणे मानली जातात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode