
पॅरिस , 03 जुलै (हिं.स.)। तीव्र उष्णता आणि दीर्घकाळापासून सुरू असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण फ्रान्समधील जंगलांना लागलेल्या आगीमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. औडे आणि हेरॉल्ट या भागांत गुरुवारी लागलेल्या आगीने सुमारे 900 हेक्टर जंगल भस्मसात केले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी 800 हून अधिक अग्निशमन दलाचे जवान, 150 अग्निशमन वाहने आणि चार वॉटर बॉम्बर विमाने तैनात करण्यात आली आहेत.
स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, आग वेगाने पसरू नये यासाठी हवाई आणि जमिनीवरील बचाव व नियंत्रण मोहीम सातत्याने सुरू आहे. शेजारच्या भागात दोन ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले, तरी प्रभावित परिसरातील काही भागांत आग अद्याप पूर्णपणे विझलेली नाही.
फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी सांगितले की, यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून देशात जंगलांना आग लागण्याच्या 7,000 हून अधिक घटना नोंदल्या गेल्या असून, आतापर्यंत 8,700 हेक्टरहून अधिक जंगल जळून खाक झाले आहे. ते म्हणाले की, सध्याची हवामान परिस्थिती वनव्याचा धोका सातत्याने वाढवत आहे. औडे विभागाचे प्रीफेक्ट अॅलन बुकेट यांनी सांगितले की, जोरदार वाऱ्यांमुळे आग आणखी पसरण्यापूर्वी ती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भूमध्य समुद्रालगतचा हा प्रदेश वनव्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो.
दरम्यान, दक्षिण फ्रान्समधील टेट नदी परिसरात जंगलाला आग लागल्यानंतर जवळील एका रिसॉर्टलगतच्या कॅम्पमधून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील सर्व लाइफगार्ड केंद्रे बंद करण्यात आली असून, नागरिकांना नदीत पोहणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, येत्या काही दिवसांतही पावसाची शक्यता अत्यल्प असून तापमान उच्चच राहण्याची आणि कोरडे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भूमध्य समुद्र परिसरात वाहणारे वेगवान वारे वनव्याची तीव्रता आणखी वाढवू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode