इराण- अमेरिका यांच्यातील चर्चा पुन्हा एकदा पाकिस्तानात होण्याची शक्यता
वॉशिंग्टन , 05 जुलै (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यातील पुढील टप्प्यातील चर्चा पुन्हा एकदा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रविवारी माध्यमांच्या वृत्तांतून समोर आली. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्
इराण- अमेरिका यांच्यातील चर्चा पुन्हा एकदा पाकिस्तानात होण्याची शक्यता


वॉशिंग्टन , 05 जुलै (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यातील पुढील टप्प्यातील चर्चा पुन्हा एकदा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रविवारी माध्यमांच्या वृत्तांतून समोर आली. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांनी १८ जून रोजी एका सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली होती. या करारानंतर पाकिस्तान आणि कतार यांच्या मध्यस्थीने २१ जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये तांत्रिक स्तरावरील चर्चा झाली होती.

राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेले मतभेद सोडवण्यासाठी तसेच राजनैतिक प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी ही चर्चा पुन्हा सुरू केली जात आहे. एका राजनैतिक सूत्राने सांगितले की, “तांत्रिक चर्चेसाठी इस्लामाबाद आणि स्वित्झर्लंडमधील बर्गेनस्टॉक रिसॉर्ट ही दोन संभाव्य ठिकाणे आहेत. मात्र, इस्लामाबादमध्ये बैठक होण्याची शक्यता अधिक आहे.”

ही तांत्रिक बैठक ११ जुलै रोजी होण्याची शक्यता असली तरी तिचे अंतिम ठिकाण अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अनेक दिवस चालणाऱ्या राजकीय शोक आणि अंत्यसंस्कार कार्यक्रमांमुळे ही चर्चा तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. अंत्यसंस्काराशी संबंधित सर्व कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतरच तेहरानकडून चर्चेसाठी प्रतिनिधीमंडळाची घोषणा केली जाईल, असे इराणी अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत.

वृत्तानुसार, या चर्चेत इराणचा अणुकार्यक्रम, इराणवरील निर्बंधांमध्ये सवलत आणि परदेशात गोठवून ठेवलेल्या इराणी मालमत्तेचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे. ११ जुलै रोजी प्रस्तावित बैठकीचा उद्देश दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या ‘इस्लामाबाद सामंजस्य करार’ अंतर्गत ठरवण्यात आलेल्या रूपरेषेला पुढे नेणे हा आहे.

या सामंजस्य करारानुसार, इराणच्या अणुकार्यक्रमासह संबंधित सर्व मुद्द्यांवर व्यापक करार करण्यासाठी दोन्ही देशांना ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये अप्रत्यक्ष चर्चा झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या चर्चेला “अत्यंत सकारात्मक” असे संबोधले होते. तर इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, परदेशात गोठवून ठेवलेल्या अब्जावधी डॉलरच्या इराणी मालमत्तेपैकी काही निधी मुक्त करण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये तत्त्वतः सहमती झाली आहे.

याआधीची उच्चस्तरीय बैठक स्वित्झर्लंडमधील बर्गेनस्टॉक रिसॉर्ट येथे झाली होती. या बैठकीत कतार आणि पाकिस्तान यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली होती. चर्चेत सहभागी असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत, निर्बंधांमध्ये सवलत, सागरी सुरक्षेला बळकटी देणे आणि प्रादेशिक तणाव कमी करण्यासाठी व्यापक कराराची प्राथमिक रूपरेषा निश्चित करण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande