
तेहरान , 05 जुलै (हिं.स.)।इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरू असून, या शोकसभेसाठी राजधानी तेहरानमध्ये लाखो नागरिकांनी गर्दी केली आहे. या प्रचंड जनसमुदायासमोर एका कलाकाराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्या हत्येची मागणी केली.
रविवारी पार पडलेल्या अंत्यसंस्कार सोहळ्यात एका कलाकाराने “आपल्या इमामाची हत्या करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू व्हावा,” अशी मागणी केली. या वक्तव्यावर तेहरानमध्ये जमलेल्या लाखो शोकाकुल नागरिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.या अंत्यसंस्कारादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या हत्येची मागणी करणारे बॅनर, पोस्टर्स आणि भित्तीचित्रेही प्रदर्शित करण्यात आली. तसेच उपस्थित नागरिकांनी “अमेरिका मुर्दाबाद” आणि “इस्रायल मुर्दाबाद” अशा घोषणा दिल्या.
कवी मोहम्मद रसौली यांनी अंत्यसंस्कार सोहळ्यात ध्वनिक्षेपकावरून बोलताना ट्रम्प यांचा थेट उल्लेख न करता उपस्थितांना प्रश्न विचारला, “जगातील सर्वात नीच माणूस अजूनही जिवंत का आहे?” या प्रश्नानंतर जमावाने “अमेरिका मुर्दाबाद” आणि “इस्रायल मुर्दाबाद”च्या घोषणा दिल्या. त्यानंतर रसौली म्हणाले, “ट्रम्पसाठी हे जग आता राहण्यायोग्य राहिलेले नाही.” या विधानानंतरही उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
दरम्यान, ९७ वर्षीय शिया धर्मगुरू आयातुल्ला जाफर सोभानी यांनी तेहरानमधील ग्रँड मोसल्ला येथे आयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अंत्यप्रार्थनेचे नेतृत्व केले. या कार्यक्रमाला इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालीबाफ, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख जनरल अहमद वाहिदी, कुद्स फोर्सचे कमांडर इस्माईल कानी तसेच खामेनेई यांचे पुत्र मसूद, मेसम आणि मुस्तफा उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode